औरंगाबाद – जालन्यात पिटलाईन सोबतच ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. लोको शेड म्हणजे रेल्वे इंजिन ची देखभाल दुरुस्ती करणारी जागा. पीटलाईनचे काम करतानाच प्रस्तावित लोको शेडचे डिझाईन तयार होणार आहे. लोको शेड झाल्यास मराठवाड्याला त्याचा फायदा होणार असून भंगार रेल्वे इंजिन पासून कायमची सुटका होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
अनेक वर्षापासून मराठवाड्यात लोको शेडची मागणी होत आहे. पूर्वी मीटरगेज असताना पूर्णा येथे लोको शेड होते. ब्रॉडगेज झाल्यावर ते बंद करण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेकरडून मराठवाड्याला मुख्य करून मौला-अली, गुंटकल, गुत्ती या लोको शेडचे इंजिन दिले जातात. तर मध्य रेल्वेकडून पुणे आणि कल्याण लोको शेडचे इंजिन दिले जातात. दमरे कित्येकदा भंगार इंजिन देत असल्याची आणि त्यामुळेच वारंवार इंजिन बिघडण्याच्या घटना घडून रेल्वे खोळंबल्याच्या घटना होत असल्याची ओरड रेल्वे संघटनांकडून होते.
मराठवाड्यात जवळपास हजार किलोमीटरचे मार्ग असून देखील लोको शेड दिले जात नव्हते. जालनाच्या माध्यमातून अखेर लवकरच मराठवाडाला लोको शेड मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. ड्रायपोर्टमुळे जालना येथून मालवाहतूक वाढणार आहे. त्यामुळे नवीन लोकोमोटिवची म्हणजेच लोको अथवा रेल्वे इंजिनची गरज भासणार आहे. यासाठी जालना येथील पीटलाईन करतानाच लोको शेड चे डिझाईन तयार केले जाणार आहे.