हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांची होती. शरद पवार भाजपसोबत येणार होते, मात्र त्यांनी निर्णय बदलला” देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाचा अनेक चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “2019 मध्ये शिवसेनेने आमचा विश्वासघात करून काँग्रेस – राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी बोलावले जात असल्याचे लक्षात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्याने आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला. यानंतर आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हा आम्ही भाजपसोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर होती. आम्ही पोर्टफोलिओ, जिल्हे याबाबत निर्णय घेतला, त्या प्रक्रियेत राष्ट्रपती राजवट लावण्याचे ठरले आणि त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. हे योग्य नाही, असे अजित पवारांना वाटले. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले”
राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवारांची
त्याचबरोबर, “2019 मध्ये झालेला हा करार अजित पवारांशी नसून शरद पवार यांच्याशी झाला होता. शरद पवार यांच्यासोबत हा निर्णय झाला. अजित पवार यांनी अधिकृत केल्यानंतरच आम्ही त्यांच्यासोबत बसलो. आता शरद पवार नवनवीन गोष्टी सांगतात. मी सत्य सांगतो. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवार यांची होती. पण ते म्हणाले, मी इतक्या लवकर यू-टर्न घेऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा. त्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेल आणि त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जात आहोत, अशी भूमिका मी घेईल” अशी भूमिका त्यावेळी शरद पवार यांनी घेतली होती असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.