हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आली आहेत. त्यामुळे नाशिक शहरात त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर दिग्गज नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती. आजच्या या समारंभामध्ये एकनाथ शिंदे यांनी मोदींचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी बोलताना, “अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है. पंतप्रधान लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप आला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणाचीही नाही. भारताचा डंका जगभरात वाजत आहे” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
तसेच, “नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नाशिकमधील पवित्र भूमित आले आहेत. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान, आजच्या नाशिक दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी घराणेशाही चा उल्लेख करत, “घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान झालं आहे. लोकशाहीमध्ये सहयोगाचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. तुम्हाला तुमचे मत मतदानाच्या रुपाने द्यायचं आहे. तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं मतदान. 25 वर्षांचं हे अमृतकाल तुमच्यासाठी कर्तव्यकालसुद्धा आहे” असे म्हणले.