कराड | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशवासीयांना इंधनदर कपातीचे मोठे गिफ्ट दिले आहे. इंधनावरील कर कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. यानंतर भाजपशासित राज्य सरकारांनी करांमध्ये कपात करून राज्यातील जनतेला आणखी दिलासा आहे. यानंतरही विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल डिझेलच्या करातून केंद्र सरकारने तब्बल 23 लाख कोटी कमावलेत असं विधान चव्हाण यांनी केले आहे.
नुकत्याच जाहिर झालेल्या पोटनिवडणुक निकालानंतर जणमत आपल्या विरोधात असल्याचं लक्षात आल्यानंच भाजपने पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या करातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले. आता हेच पैसे किसान सन्मान व इतर गोष्टींकरता वापरले जात आहेत. नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढून दुसरीकडे तेच पैसे देताना आम्ही पैसे दिल्याचा आव सरकार आणत असल्याचं चव्हाण यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली पेट्रोल डिझेलची दरवाढ दिवाळीच्या तोंडावर बुधवारी थांबली होती. यापूर्वी पेट्रोलच्या दरात सलग 7 दिवस तर डिझेलच्या दरात सहा दिवस 35-35 पैशांची वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ करण्यात आली होती. परंतु डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. दिल्लीत बुधवारी पेट्रोलचे दर 110.04 रूपये तर डिझेलचे दर 98.42 रूपये प्रति लीटर इतके होते.
दरम्यान, गुरूवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 115.85 रुपयावर स्थिर होता. तर दिल्लीत पेट्रोल 110.04 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 106.66 रुपये, कोलकात्यात एक 110.49 रुपये तर भोपाळमध्ये आज पेट्रोलचे दर 118.83 रुपये इतके होते. तर दुसरीकडे मुंबईत डिझेलचा दर 106.62 रुपये इतका होता.