कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातीळ काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडात पाणी टंचाईसदृश गावांची आढावा बैठक घेतली. तसेच पाणी टंचाईच्या गावांतील बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरीचे खोलीकरण अशी कामे तात्काळ अधिकाऱ्यांनी करावीत, अशा महत्वाच्या सूचना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्या.
कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, तालुका गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार बी. के राठोड, सार्वजिनक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून कराड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा गावनिहाय आढावा घेतला. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या जाणून घेतलया. कराड तालुक्यातील 19 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्या वानरवाडी, बामणवाडी, येवती, भुरभुशी, पवारवाडी-नांदगाव, भरेवाडी, ओङोशी, मस्करवाडी-उंब्रज, घोलपवाडी, गोसावीवाडी, गायकवाडवाडी, नाणेगाव, कोरीवले, वडगाव-उंब्रज, गोडवाडी, अंधारवाडी आदी गावामध्ये पुढेही टँकर सुरु ठेवण्याच्या सूचना आ. चव्हाण यांनी केल्या.
तसेच वानरवाडी, बामणवाडी, येवती, भुरभुशी, पवारवाडी-नांदगाव, भरेवाडी आदी गावांना मलकापूर नगरपरिषदेतून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे अशा गावांना तात्काळ टँकर पाठवावेत, तसेच अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.