कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पेगॅसिसबाबत केंद्र सरकारवर विरोधकांकडून आरोप केले जात आहे. त्यांच्या तर आता काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरनावावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे कि, आम्ही सरकारच्यावतीने हेरगिरी केलेली नाही. मात्र, सरकार तसे स्पष्टपणे सांगत नाही. जर केले असेल तर हा लोकशाहीचा शेवट, खून म्हणावा लागेल. याचा जितका निषेध करावा तितके थोडे आहे, अशी टीका आमदार चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
कराड येथील माध्यमांशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले की, ” हेरगिरी प्रकरण हा देशातील इतिहासातील सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. लोकशाही मोडण्याकरिता केंद्र सरकारचे जे काही प्रयत्न चालले आहेत. एखाद्या विदेशी संस्थेला पैसे देऊन विदेशी सॉफ्टवेअर विकत घ्यायचे. देशातील विरोधी पक्षातील नेते, पत्रकार यांच्यासह नामांकित व्यक्तींची हेरगिरी पेगॅसिसमार्फत करण्याचा प्रकार सध्या केंद्रातील भाजप सरकार करत आहे. यात अनेक देशाचा समावेश आहे. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
एकीकडे पेगॅसिसकडून म्हंटले जात आहे कि, आम्ही सरकारव्यतिरिक्त कोणालाही माहिती दिलेली नाही. तसेच सॉप्टवेअर आम्ही कोणत्याही खासगी कंपनीला विकलेले नाही. मात्र, भारतातील लोकांवर हेरगिरी सध्या होत आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे कि, आम्ही सरकारच्यावतीने हेरगिरी केलेली नाही. मंत्री सांगत आहेत की, आम्ही नियमाने सर्व केले आहे. त्यांनी केले असेल तर तुम्ही नियमाने व परवानगी घेऊन केले आहे का? जर केले असेल तर अत्यंत दुर्देवी गोष्ट म्हणावे लागेल. हा लोकशाहीचा शेवट, खून म्हणावा लागेल. याचा जितका निषेध करावा तितके थोडे आहे. त्यामुळे या हेरगिरी प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या समिती मार्फत व्हावी, अशी आम्ही मागणी करीत असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली.