कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. . “सरकारकडुन वैयक्तिक मदत होत आहे याविषयी तक्रार नाही. मात्र, पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या सार्वजनिक पाणी पूरवठा योजना, केटीवेअर, पुल, रस्ते यांची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेची आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याबाबत तशा स्वरूपाचा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधीत विभागाला द्याव्यात.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शेती, राहती घरे यासह जनजीवनावर अपरिमित नुकसान ओढवले आहे. त्याचप्रमाणे कराड दक्षिण मतदारसंघातील दक्षिण मांड नदीच्या पुरामध्ये नुकसान झाले आहे. या भागाचा नुकताच माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे महत्वाची मागणी केली.
आमदार चव्हाण म्हणाले की, कराड दक्षिण भागाचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत शेती पिके, नळपाणी पुरवठा योजना, केटीवेअर, पुल, रस्ते यांचाही समावेश आहे. या कामाची दुरुस्ती राज्य सरकारने तात्काळ करणे गरजेची आहेत. अतिवृष्टी व महापुरामुळे दोन प्रकारचे नुकसान झाले आहे. एक वैयक्तिक नुकसान व दुसरे कायम स्वरूपाचे सार्वजनिक प्रकारचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ अशा प्रकारची कामी हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, असे आमदार चव्हाण यांनी म्हंटले आहे.