कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशात आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कराड येथे कमरे बंद चर्चा झाली. यावेळी या दोघांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कराड येथे आले होते. उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन थोरात हे कराड येथे आले. यानंतर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील सर्किट हाऊसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी थोरात अन् चव्हाण यांच्यामध्ये सुमारे अर्धातास कमरबंद चर्चा झाली.
या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. चर्चा संपल्यानंतर बाळासाहेब थोरात यांंनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. कमरा बंद चर्चेवेळी त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना बोलावून काही महत्त्वाच्या सूचना केल्या तसेच त्यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा घेतला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहतसिलदार अमरदीप वाकडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.