कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना अजून किती दिवस असणार याबाबत निश्चित कोणालाच सांगता येत नाही. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव सरकारला आहे. यामुळे येणार्या काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती स्विकारावी लागेल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पयुटरद्वारे शिक्षण घ्यावं लागेल याशिवाय आता तरी दुसरा काहीच पर्याय नाही असं चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.
याचबरोबर परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. सध्या रशियामध्ये असणार्या भारतातील सुमारे 120 विद्यार्थ्यांनी संपर्क साधला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रीय मंत्रालय तसेच महाराष्ट्र सरकारची काय उपाय योजना केली आहे याची माहिती घेतोय असे चव्हान यांनी सांगितले आहे.
तसेच कंटेनमेंट झोन वगळून राज्यातील एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी कामगार, विद्यार्थ्यांची सोय जाईल पाहिजे. जर लोक आपापल्या घरी पोहोचले तर त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था होऊ शकते, तसेच त्यांना क्वॉरंटाईन करणेही सोयीस्कर होईल शकते. लॉकडाऊन 4 हा 31 मेपर्यंत असला तरी या कालावधीत जर रुग्ण संख्या वाढली नाही तर येणार्या काळात पूर्णपणे शिथीलता दिली जाऊ शकते. उदयोग धंदे सुरू होतील. मात्र सध्या मुंबईची परिस्थिती तशी चिंताजनकच आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.