कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून संसद भवनातून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावरून सध्या काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही राहुल गांधी यांच्या कारवाईचे पडसाद उमटले. दरम्यान गांधी घराण्याच्या जवळ असलेले काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीतील काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट्य कोणतं असणार? हे सांगितलं आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणाही साधला आहे.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीतील काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट्य हे नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे हे आहे. नरेंद्र मोदींना देशातील महागाई बेरोजगारी आर्थिक प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या असे विविध प्रश्न सोडवण्यात अपयश आलं असून त्या तुलनेत राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेमुळे उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
परदेशातही राहुल गांधींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे यामुळे मोदी सरकार हादरले आहे. यामुळे चिडून जाऊन राहुल गांधींच्यावर सूडबुद्धीने मोदी सरकारने ही कारवाई केली आहे. त्यांनी अघोषित आणीबाणी लागू केली आहे. काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांना मिळत असलेली लोकप्रियता पाहला त्यांचा आवाज बंद करण्यासाठी हा प्रयत्न झाला आहे.
अन् पृथ्वीराजबाबांनी सांगितलं 2024 च्या निवडणुकीतील काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट्य… pic.twitter.com/tkFEiMz14f
— santosh gurav (@santosh29590931) March 25, 2023
काँग्रेस खासदार राहुल गांधी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. अशातच आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.