Satara News : राहुल गांधींचे अदानींबाबतचे मुद्दे जिव्हारी लागल्यानेच त्यांची खासदारकी रद्द; पृथ्वीराज साठेंचा आरोप

Prithviraj Sathe alleged BJP and Gautam Adani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून गौतम अदानी यांच्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. अदानींच्या विदेशातील कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक झालेला पैसा कुणाचा?, हा सवालही राहुलजी यांनी विचारला होता. त्यांचे असे मुद्दे जिव्हारी लागल्यामुळेच भाजपने स्थगिती लागलेले प्रकरण पुन्हा बोर्डावर आणून गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसामचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

आसामचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीतसिंह देशमुख, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, रजनी पवार, अजित पाटील-चिखलीकर, धनश्री महाडिक आदी उपस्थित होते.

यावेळी साठे म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर बाब म्हणजे गौतम अदानी यांच्या मोठ्या भावाकडून एक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. आणि त्या कंपनीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ठेका देण्यात आलेला आहे. याच कंपनीत एका चँग चूंग लिंग या चिनी उद्योजकाचीही मोठी गुंतवणूक आहे. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत जे काही श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे दौरे केले आहेत. त्याच्या या दौऱ्यामुळेच अदानीला ठेके मिळाले आहेत.

वास्तविक राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटक निवडणुकीत सुशील मोदी व नीरव मोदींचे नाव घेऊन जे वक्तव्य केले, त्याप्रकरणी सुरत उच्च न्यायालयात खटला दाखल केला. परंतु संबंधित फिर्यादीने यावर स्थगिती आणली होती. यानंतर राहुल गांधी यांनी 2023 मध्ये संसदेत उपस्थित केलेले प्रश्न जिव्हारी लागले. यामुळेच 2019 चे प्रकरण पुन्हा बोर्डावर आणले. पंतप्रधान मोदींकडून अदानीला एवढे का पाठीशी घातले जात आहे? अदानी म्हणजे देश आहे काय? सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असून, 2024 ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असण्याची शक्यता असल्याचे साठे यांनी म्हंटले.