सातारा जिल्हयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा खाजगी रुग्णालयात तुटवडा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 हजार 395 कोरोना बाधित आढळल्याने सातारा जिल्हा सुद्धा कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागला आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने कोरोना बाधितांचे कुटुंब चिंतेत आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रयत्नातून शासनाकडून 1 हजार 260 इंजेक्शनचा साठा उपलब्ध केला आहे. इंजेक्शन फक्त शासकीय रुग्णालयातील जिल्हयातल्या 18 केंद्रांना दिले जाणार असल्याने जे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सातारा, फलटण, कराड, खटाव व माण या परिसरामध्ये खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रमाणे सातारा मध्ये सुद्धा या औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी सुद्धा जोर धरु लागली आहे.

जिल्ह्याला दररोज 500 इंजेक्शनची गरज ः डाॅ.‌सुभाष चव्हाण

सातारा जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज यांना रेमडेसिविर हे इंजेक्शन दिले जात असल्याने खाजगी रुग्णालयातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची होणारी वाढ हा चिंतेचा विषय आहे. दररोज सुमारे तेराशे ते चौदाशे कोरोणा रुग्ण वाढत असून सातारा जिल्ह्यात सध्या 500 रेमडेसिवीर इंजेक्शनची रोज गरज भासत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

जादा पैैसे देवूनही इंजेक्शन मिळेना ः प्रविण पाटील

रेमडेसिविर हे इंजेक्शन त्वरित खाजगी रुग्णालयातील रुग्णांना मिळावे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासुन मागणी होत आहे. किंबहूना आगाऊ पैसे देऊनही सदर रेमडेसिवीर इंजेक्शन सातारा जिल्ह्यात मिळत नाही, यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी. अशी मागणी सातारा जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केली आहे.

रूग्णांच्या नातेवाईकांची फरफरट

गेल्या सहा दिवसात रेमडिसीवरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. सध्या जरी इंजेक्शन उपलब्ध होत असले, तरी हे इंजेक्शन फक्त शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मिळत असल्याने आमची चांगलीच फरफट होत आहे, रूग्णांचे नातेवाईक विलास कणसे,बापु करे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like