व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना फासलं काळं; शरद पवारांविरोधात केलं होतं वक्तव्यं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं आहे. नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. हा सर्व प्रकार आज पुण्याच्या पत्रकार भवन येथे घडला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी आज नामदेव जाधव यांना घेरलं. तसेच त्यांच्या तोंडाला काळं फासलं.

यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊद्या. पण शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे. नाही तेव्हा तो शरद पवारांच्या पाया पडायला यायचा. आम्ही शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही. शरद पवारांबद्दल अपशब्द बोलल्यामुळेच त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात आला आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे.

दरम्यान, आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये नामदेव जाधव यांचा कार्यक्रम होणार होता. परंतु इन्स्टिट्यूटने कार्यक्रमास परवानगी दिली नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी नामदेव जाधव पत्रकार भवनासमोर आले होते. याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले. तसेच, नामदेव जाधव बोलत असताना त्यांना काळं फासलं. या सर्व प्रकारामुळे पत्रकार भवनाच्या बाहेर गोंधळ उडाला.