जालना :- केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे खताच्या रिकाम्या बॅग जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ऐन रब्बी हंगामात खत दरवाढीचा निर्णय घेऊन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खत दरवाढ करून मोठा धक्का दिला आहे. रब्बी हंगामात दरवाढीचा निर्णय घेऊन मिश्र खतांच्या प्रत्येकबॅग चे दोनशे ते तीनशे रुपये दरवाढ केली आहे.आधीच आस्मानी संकटा मुळे मेटाकुटीला आलेला बळीराजा खत दरवाढी च्या सुलतानी संकटामुळे धास्तावला आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत “मागे घ्या मागे घ्या,खत दरवाढ मागे घ्या”, “शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा धिक्कार असो”, “जय जवान जय किसान” आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार ९ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत खत दरवाढीच्या निषेधार्थ मोकळ्या बॅग जाळून रोष व्यक्त करण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश काळे,पांडुरंग गटकळ,विष्णू नाझरकर,विद्यार्थी आघाडी प्रमुख गणेश गावडे,सुनील गायकवाड,अंकुश तारख,बाबासाहेब दखणे,गोरख कोल्हे,चंद्रकांत खमितकर,उमेश बर्वे,गोरखनाथ लटपटे आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.