सांगली । देशातील मोलकरीण महिला व महिला पोलीस अधिकार्यांचा अवमान करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा मोलकरीण संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष सुमन पुजारी व सचिव विद्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे आमदार पडळकर यांनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पालकमंत्र्यांच्या घरचे कामगार असल्यासारखे वागतात. तसेच अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले ही धुणे-भांड्याला जयंत पाटलांच्या घरी असल्यासारखे वागतात, असे वक्तव्य केले आहे.
हे वक्तव्य अत्यंत धक्कादायक असून मोलकरीण महिलांच्याबद्दल अवमान करणारे आहे. धुणे भांडी करत असलेल्या महिलांच्या कामास व सर्व महिलांना हीन दर्जा देऊन संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान पडळकर यांनी केलेला आहे. याबाबत महिलांच्यामध्ये असंतोष वाढत असून त्या शासनाला विचारीत आहेत की, पुणे-भांडी करणे हे सन्मानाचे काम नाही काय? या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन पडळकर यांच्यावर शासनाने त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
देशात स्त्रीयांच्यावरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी जास्तीत जास्त महिला पोलिस अधिकार्यांची आवश्यकता आहे. महिला पोलिसांच्याबद्दल समाजामध्ये आदराची भावना आहे. परंतू पडळकर आमदार असूनही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वागण्याऐवजी बेजबाबदार वर्तन करीत असल्याची बाब गंभीर आहे, त्यांच्यावर वचक बसवण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.