Monday, January 30, 2023

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच काढणीला आलेले पीक मातीमोल झालं आहे. हातातोंडाचा घास गेल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, राज्यात आतापर्यंत १२३ % पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा २३ % अधिक आहे. यंदा जुलै-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं जवळपास २५ लाख शेतकऱ्यांना फटका बसला तर आता सुरु असलेल्या परतीच्या पावसाने ४५ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. बहुतांश ठिकाणी तर दोनदा-तीनदा नुकसान झालंय.

- Advertisement -

एकंदर संपूर्ण हंगामच वाया गेल्याने यंदाची परिस्थिती अतिशय भयाण आहे. राज्याच्या सर्वच भागातील शेतकरी पूर्णतः उध्वस्त झालाय. अशा कठीण प्रसंगी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकर यांनी मागील काळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केलेली मागणी निश्चितच शेतकरी हिताची होती. आताही तीच भूमिका घेऊन त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न कराल,ही अपेक्षा! असं रोहित पवारांनी म्हंटल.