औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. औरंगाबाद – पुणे द्रुतगती मार्गावर 140 प्रतितास वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या एक्सप्रेस-वे मुळे मराठवाड्याच्या विकासा मोठी गती मिळेल, असेही गडकरी म्हणाले. 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते अमेरिकेतील रस्त्यांच्या दर्जाचे करणार असल्याचे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी दिले.
गडकरी यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये 5 हजार 570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस-वेची महत्त्वाची घोषणा केली. औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते. या वेळी गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटीं रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. नगर नाका ते केंब्रिज स्कूल या 14 किलोमीटर रस्त्याचेही लोकार्पण यावेळी झाले. राष्ट्रीय महामार्ग 752 लेन पेव्हड शोल्डर बीटी रोड या 181 कोटींच्या 29 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण ही यावेळी झाले.
गडकरी यांच्या हस्ते इतरही विकास कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. यावेळी औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग 752 विभागातील चिखली दाभाडी तळेगाव या 37 किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजनही गडकरींच्या हस्ते झाले.