Tuesday, June 6, 2023

गावी जाण्याकरिता पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती देणं भोवलं; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुणे । मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ११ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत राहणाऱ्या या ११ जणांना कोकण, सातारा, सांगलीत जायचे होते. मात्र, मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून प्रवासासाठी डिजिटल पास मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते मूळ गाव या प्रवासासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला. त्यात जोडलेला मोबाइल क्रमांक, आधार कार्ड आणि वैद्यकीय सर्टिफिकेट एकच असल्याचे आढळले.

अधिक चौकशी केली असता, डिजिटल पाससाठी अर्ज केलेले सर्व ११ जण मुंबईचे रहिवासी असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी मंगेश कळसकर, प्रशांत मयेकर, सागर देवरुखकर, तेजस अनंत चेवुलकर, नरेश साबळे, राजू गुजर, स्वप्नील धनावडे, अनंत डिचोलकर, योगेश भोसले, सागर पवार, सिद्धेश सुवरे यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आर्थिक फायद्यासाठी संबंधितांना पास मिळवून देण्यासाठी रितेश लष्करे (रा. पनवेल, मुंबई) याने मदत केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तपास केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”