पुण्याच्या पैलवानांवर काळाचा घाला; अपघातात तीनजण जागीच ठार तर 8 ते 9 जण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा परिसरात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचा रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये तीनजण जागीच ठार तर आठ ते नऊजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही कार रस्त्याकडेच्या नाल्यातून बाजूच्या झाडांवर जावून आढळल्या. अपघातातील सर्वजण पुणे येथील असल्याचे समजते. राहुल दोरगे (वय 28), स्वप्निल शिंदे (वय 28), बाळासाहेब कांबळे (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर गणेश काळे (वय 28), बाळासाहेब गदळे (वय 31), तुषार गावडे यांच्यासह अन्य पाच ते सहाजण जखमी झालेले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कोल्हापूर बाजूकडुन पुणे बाजूकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. त्या दोन्ही कार कराड तालुक्याच्या नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अटकेटप्पा येथे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूल असलेल्या झाडावर जाऊन आढळल्या. अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.

तसेच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी त्वरीत कराड येथील रुग्णालयात पाठविले. अपघात स्थळी दोन्ही गाड्यांच्या काचा पडल्या होत्या. तर मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

अपघातातील सर्व जखमी पुणे व पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन्हीही कार कोल्हापूर बाजूकडून भरधाव वेगात पुण्याकडे निघाले असताना घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी रात्री उशीरा पर्यत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

You might also like