पुणे प्रतिनिधी। दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचा आलेख उंचावतच चालला आहे. हैद्राबाद मध्ये घडलेल्या अत्याचाराने तर संपूर्ण देशच हादरला आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय अशोक लोणारे (वय 21, रा. कोंढवा) याला सात वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त चार महिने कारावसा भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
दरम्यान ही घटना 18 जून 2015 आणि त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर घडली होती. पंधरा वर्षीय पीडित मुलीच्या आईने याबाबत कोंढवा पोलिसात फिर्याद दिलेली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी कोंढवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल अंकुश केंगळे, संतोष अंगणे यांनी मदत केली. लग्नाच्या अमिषाने लोणारे याने पीडितेला पळवून नेले. दुसऱ्या दिवशी ते दोघे मिळून आले. त्यानंतर केलेल्या तपासात त्याने पळवून नेण्याच्या चार ते पाच दिवस अगोदर तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे.