हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि पुण्याला ये -जा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणे ते मुंबई प्रवास फक्त तासाभरात करता येणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया मुंबई-पुणे थेट विमानसेवा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दोन्ही शहरे अतिशय जवळ असल्याने हा देशातील सर्वात कमी अंतराचा हवाई मार्ग असेल. पुणे ते मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर आजपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
यापूर्वी मुंबई आणि पुणे दरम्यान जेट एअरवेजकडून हवाई वाहतूक सुरू होती, परंतु ती काही कारणास्तव अचानक बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. शनिवार सोडून रोज ही विमानसेवा सुरु राहील. मुंबईहून पुण्याला येण्यासाठी सकाळी ९.४५ मिनिटांनी पहिले विमान आहे तर पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी ११.२० मिनिटांनी विमान असेल.
तिकीट किती?
एअर इंडियाच्या वेबसाईटनुसार पुणे ते मुंबई इकॉनॉमी क्लाससाठी २२३७ रुपये तर सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी क्लाससाठी ३७३८ तिकीट दर आहे. फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी ६५७३ अन् फेक्झिबल इकॉनॉमीसाठी ११ हजार ८२३ रुपये तिकिटांची किंमत आहे. तसेच मुंबईवरून पुण्याला यायचं असेल तर इकॉनॉमी क्लाससाठी १९२२ रुपये आणि सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी क्लाससाठी ३४२३ असा तिकीटाची किंमत आहे. तर फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी ६२५८ अन् फेक्झिबल इकॉनॉमीसाठी ११ हजार ५०८ रुपये तिकीट दर आहेत.