‘पुष्पा’ अखेर मिरजेत जेरबंद ! तब्बल अडीच कोटीचे लाल चंदन जप्त

सांगली  | सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती आज सांगली जिल्ह्यात आली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या चंदनाच्या तस्करीचे रॅकेट मिरज गांधी पोलिसांनी उधळून लावले. यावेळी पोलिसांनी तब्बल अडीच कोट रुपये किमतीचे एक टन रक्त चंदन जप्त केले. मिरज पोलीस आणि वन विभागाने छापा टाकून संयुक्त कारवाई केली. या दुर्मिळ लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या यासिन इनायतउल्ला खान याला अटक करण्यात आली आहे. सदरची टोळी हि अंतरराज्य असल्याने याची पाळेमुळे खणणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला.

आंध्र प्रदेश मधील शेषाचलम जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची सारी कथा या लाल चंदनाच्या अनुषंगानेच चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली आहे. विविध औषधी गुणधर्म असेलल्या रक्तचंदनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी रक्तचंदनाची झाडं आहेत. विशेषत: दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात रक्त चंदन आढळतं. औषधी गुणधर्म आणि जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी या दोन कारणांमुळे रक्त चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिरज गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.

फडणीस यांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता टेम्पो मध्ये मागील बाजूस द्राक्ष बागेत वापरलेले जाणारे बकेट मागे ठेऊन त्या मागे रक्तचंदन लपवलेले होते, वाहनात रक्तचंदन लाकूड असल्याचे वन विभागाकडून खात्री करण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.