हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर आता शिंदे गटातील नेत्यांकडूनही निशाणा साधला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे. तो कुणाच्या गालावर आणि कुणाच्या पाठीवर पडलाय हे सांगायची गरज नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेले आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होते. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेले आहे. पुढची 20 वर्ष शिंदे-फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहणार आहे.
वाचाळपणा केल्यास एकटे पडणार
आपण जे बोलतोय त्याचे भान उद्धव ठाकरे यांना नाही. अडीच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पूर्तता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना अगोदरच दिल्या आहेत. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले,
बुलढाणा जिल्ह्या शेतकरी संवाद कार्यक्रमातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं… अन् हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघाले, असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता.