Sunday, May 28, 2023

PF चे पैसेही अदानीकडे, इतकी भीती कशासाठी? राहुल गांधींचा मोदींवर आणखी एक हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदारकी रद्द झाल्यांनतर काँग्रेस नेते राहुल गांधी अजून आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला आहे. जनतेचा पैसे अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

LIC चे पैसे अदानीकडे! SBI चे पैसे अदानीकडे! EPFO चे पैसेही अदानीकडे! ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? पंतप्रधानजी, चौकशी नाही, उत्तर नाही! एवढी भीती कशाला? असं ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वार केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर राहुल गांधी सातत्याने टीका करत आहेत. संसदेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सुद्धा त्यांनी मोदी आणि अदानी यांचं नेमकं काय नातं आहे असा सवाल केला होता. अदानी यांना मोदी सरकारने 6 विमानतळे दिली. यासाठी सरकारने नियमामध्ये बदल केला. अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली? हा पैसे कोणाचा? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. हे 20 हजार कोटींचे प्रकरण बाहेर येईल म्हणून सरकार घाबरलं. पण केंद्र सरकार माझा आवाज दाबू शकत नाही. माझी खासदारकी रद्द करून तुम्ही मला गप्प करू शकत नाही असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारला ललकारले होते.