हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला. “विरोधकांकडून भारत जोडो यात्रेवर टीका केली जात आहे. देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. मोठ मोठ्या उद्योजकपतींची कर्ज माफ केले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचे का केली जात नाहीत. या सरकारकडून नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले. तर दुसरीकडे भाजपकडून दहशत, द्वेष आणि हिंसा पसवण्याचे काम केले जात असल्याने या विरोधात आपण ही यात्रा सुरु केली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री सच्च्या हृदयाने शेतकऱ्यांचा आवाज ऐकतील तर शेतकऱ्यांच्या समस्या कमी होतील. भारत जोडो यात्रेत मला येऊन भेटणाऱ्या तरुणांच्या व्यथाही मी रोज ऐकतोय. ही मुलं हजारो, लाखो रुपये भरून शिक्षण घेतायत पण तरीही ती आज बेरोजगार आहेत. ही मुलं मजुरी करतायत, पडेल ती कामं करतायत. या मुलांची स्वप्नं मोठ्या उद्योगपतींकडून चक्काचुर केली जातायत. असा भारत आम्हाला नकोय.
प्रेमाचा संदेश एकमेकांत रुजवण्याचं काम…
शेतकरी, तरुण, महिला या सगळ्यांच्या मनात भीती निर्माण करून त्या भितीचं रूपांतर भाजपकडून द्वेषात केले जात आहे. देशात अशा वेगवेगळ्या कुटुंबात द्वेष निर्माण झाला तर ती सुखाने कशी नांदतील? जर कुटुंबाला फायदा झाला नाही तर देशाला कसा होईल? महाराष्ट्राच्या मातीतील संत आणि समाजसुधारकांचा वारसा सांगत प्रेमाचा संदेश एकमेकांत रुजवण्याचं काम भारत जोडो यात्रा करत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हंटले.
महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आयुष्यभर विसरणार नाही.
देशात द्वेष पसरवणाऱ्या लोकांनी स्वतः कधी त्रास सहन केला नाही. त्यांच्या मनात नेहमी दुसऱ्यांना त्रास देण्याचाच विचार होता. महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणाऱ्या शिवाजी महाराजांनी आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी जे उदात्त विचार मांडले. त्याच विचारांवर पुढे जायचं काम भारत जोडो यात्रा करत आहे. यात्रेत चालणाऱ्या लोकांनी आणि महाराष्ट्राने भारत जोडो यात्रेत दिलेलं ज्ञान, प्रेम आणि आपुलकी आयुष्यभर लक्षात राहील. ते मी आयुष्यभर विसरणार नाही, असे गांधी यांनी म्हंटले.