हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडलेला दिसला. भारत छोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुख्य म्हणजे, या भारत छोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची एक वेगळीच प्रतिमा नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी महाराष्ट्रात पद यात्रा काढण्याच्या तयारीला लागले आहेत. येत्या १६ ऑगस्टनंतर राहुल गांधी महाराष्ट्र पद यात्रा सुरू करणार आहेत. याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना, “महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभारी नेमले आहेत. ते लोकसभा संघात दोन दिवस राहून आता परिस्थिती काय आहे, याचा अहवाल देतील. 15 ऑगस्ट पर्यंत ते अहवाल देतील आणि 16 ऑगस्ट रोजी बैठक होईल त्यात चर्चा होईल. त्यानंतर राज्यात पदयात्रा काढणार आहे” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. मात्र अद्याप राहुल गांधी यांच्याकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
मुख्य म्हणजे, “राहुल गांधी यांची यात्रा सुरू होणार असून आम्ही सहा विभागात जाणार आहोत. पूर्व विदर्भाची जबाबदारी माझ्यावर, पश्चिम विदर्भाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे असेल तर पश्चिम महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण, मराठवाडा अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र बाळासाहेब थोरात यांच्याकडे असेल. कोकणात सगळे नेते जाणार आहेत” अशी माहिती देखील पटोले यांनी माध्यमांची संवाद साधताना दिली आहे.
तसेच, “ही पदयात्रा 31 ऑगस्टपर्यंत संपणार असून त्यानंतर बसमधून पोलखोल यात्रा होणार आहे. यादरम्यान वज्रमूठ सभा देखील होतील. पोलखोल यात्रा ही बसमधून होणार असून त्याचा रुट जाहीर आहे” असे पटोले यांनी सांगितले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची महाराष्ट्र पद यात्रा आगामी निवडणुकांवर परिणाम करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. यामुळे त्यांनी नव्या जोराने काम करण्यास सुरुवात केली आहे.