सोलापूर प्रतिनिधी । या विधानसभा निवडणुकीमध्ये निसर्गाने उमेद्वारांचीच नाही तर मतदारांनचीही परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने कहर केला आहे. अद्यापदेखील राज्यात पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचारादरम्यान देखील पावसाने अनेक सभा, रॅलीचे नियोजन फिस्कटवले. काही सभा आणि रॅली भर पावसात देखील पार पडल्या.
आज सोमवारी २१ ऑक्टोबरला राज्यात निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडते आहे. गेली दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरुच असल्याने सोलापुरात मतदान केंद्रात पाणी शिरले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील भवानी पेठ जलशुद्धीकरण मतदान केंद्रात पाणी शिरलं आहे. काल रात्री आणि पहाटे पासून सोलापूर शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याकारणाने मतदानावर याचा परिणाम होतं असताना पाहायला मिळत आहे. मतदान प्रक्रिया सकाळी ७ पासून सुरु झाली असून पावसाची रिपरिप सुरु आहे, त्यात काहीप्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे मतदार मतप्रक्रियेसाठी हजर नसल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात मतदार मतदानासाठी आले असले, तरी पावसाचा जोर कामीं झाल्यानंतर मतदार मतदानासाठी येतील अशी चिन्ह दिसत आहेत.