राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजारांची मदत करा; राज ठाकरेंची मागणी

raj and uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून हातातोंडाशी आलेले पीक तर गेलेच आहे, परंतु घरादाराचेही नुकसान झालेले आहे, असे सांगतानाच ही वेळ आणीबाणीची असून अशा वेळेस प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे. अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.