हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल कोश्यारींना पत आहे. पण पोच नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यपालांविषयी एक शंका आहे. त्यांना कोणी काही सांगतं की काय असं वाटतं. वाद उकरून काढायचे आणि सर्व फोकस दुसरीकडे वळवायचा असं काही सुरू आहे का? असे वाटत आहे. या मागे व्यूव्हरचना सुरू आहे का? अशी शंकाही मनामध्ये येते. माणसाला पत येते, पण पोच येत नाही. आणि राज्यपालांनाही ती पोच नाहीच.
कुणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं करू नका. तुम्ही अॅथोरिटी नाही. जी लोकं आहेत त्यांच्याकडून कागदपत्रं तपासा. जे लेखक आहेत, सिनेमा करणारे आहेत. त्यांना भेटा. त्यांच्याशी एकदा बोला. तुम्ही चित्रपट करत आहात त्याबाबतचं तुम्ही कसलं संशोधन करत आहात. कुठून पुरावे घेतले ही माहिती त्यांना विचारा, असंही त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. फक्त वाद सुरू ठेवा. महाराजांनी जे सांगितलं जे घडवलं ते काही घेऊ नका. फक्त वाद करा. करत बसा म्हणावं. आपलं अपयश झाकण्यासाठी यासर्व गोष्टी काढल्या जातात, असे ठाकरे यांनी म्हंटले.
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.