महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते असं सांगताना अपराध परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय अशी खंत व्यक्त केली आहे.

काय म्हटलं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये 
आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं यातच गांधींना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय.

त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरु झालं आहे.

‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरुर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. करोनाच्या या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधीच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment