ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून राज ठाकरेंनी घेतला मराठी कलाकारांच्या अडचणींचा आढावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. परिणामी अनेक कलाकारांचे या दरम्यान अत्यंत हा होत आहेत. अश्यावेळी यांना मदतीची गरज आहे हे लक्षात आले असता मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी मराठी करमणूक क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या या व अश्या अनेक समस्यांचा आढावा घेतला आहे. राज ठाकरे यांनी आज (दि. २० मे २०२१ रोजी) ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून नाटक, चित्रपट, संगीत आणि टीव्ही मालिका क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांसमवेत संवाद साधला. या मीटिंगमध्ये ५० हुन अधिक कलाकार हजर होते. या बाबतची माहिती फेसबुकच्या अधिकृत मनसे पेजवरून देण्यात आली आहे.

https://www.facebook.com/mnsadhikrutpage/posts/3996348630456974

मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी आज संवाद साधला आहे. या संवाद दरम्यान कलाकारांच्या तातडीच्या मागण्यांविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. या ऑनलाईन मिटींगमध्ये मनसे – अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष – अमेय खोपकर, मनसे नेते – अमित ठाकरे, स्टार प्रवाह वाहिनीचे प्रमुख – दिग्दर्शक सतीश राजवाडे, निर्माते दिग्दर्शक – महेश कोठारे, निर्माते दिग्दर्शक – महेश मांजरेकर, निर्माते अभिनेते – प्रशांत दामले, दिग्दर्शक – केदार शिंदे, अभिनेता – अंकुश चौधरी, अभिनेता दिग्दर्शक – पुष्कर श्रोत्री, अभिनेता दिग्दर्शक – प्रसाद ओक, अभिनेता – सचित पाटील, संगीतकार – राहुल रानडे यांचा समावेश होता.

मनसे अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत माहिती देताना काही फोटोज देखील शेअर केले आहेत. सोबत लिहिले कि, मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला आणि समस्या समजून घेतल्या. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ संवादाचं आयोजन केलं होतं.

Leave a Comment