हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जंगी सभा आहे. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. अहमदनगर येथील घोडेगावजवळ हा अपघात झाला.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. यात अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाडीच्या बोनेटच नुकसान झालं. औरंगाबाद येथे राज ठाकरेंच्या आयोजित सभेसाठी राज ठाकरे हजारों कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होत असताना रस्त्यात हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
तत्पूर्वी, राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा व्यवस्थित पार पडावी यासाठी पुण्यातील दीडशे ब्राह्मणांकडून त्यांना आशीर्वाद देण्यात आला. राज ठाकरेंसाठी चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वाचे पठण झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतले. दर्शनानंतर राज ठाकरे हे औरंगाबाद ला जात असतानाच त्यांच्या ताफ्यातील गाडीला घोडेगाव येथे हा अपघात झाला.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेसाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते औरंगाबाद कडे निघाले आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदी वरील भोंगे हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात या विषयाने जोर धरला. त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे उद्या औरंगाबाद येथे मोठी सभा घेणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे