सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. याचदिवशी शेतकरी विरोधी धोरणासाठी देशातील २६५ संघटनांनी ग्रामीण भारत बंदला पुकारला असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शेतकरी मेळावा झाला. वसंतदादा कारखाना अध्यक्ष विशाल पाटील, संदीप राजोबा, संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, देशभरातील २६५ संघटनांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या शेतकरी प्रश्नांवरील धोरणां विरोधात लढणार आहे. राज्य सरकारचे कर्जमाफी व अन्य धोरणांविरोधात ८ जानेवारीला ग्रामीण भारत बंद ठेवला जाईल. कोणत्याही प्रकारचा आयात, निर्यात होऊ देणार नाही. आताच्या राज्य सरकारने सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अध्याप तसे झालेली नाही. हे चुकीचे आहे असे शेट्टी यांनी म्हटले.
तसेच राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्र्याचे खातेवाटप करुन शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. सरकारने तातडीने पाऊले उचलावीत अन्यथा याचा उद्रेक राज्यात मोठा जाणवेल. सध्या दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. ८ जानेवारीच्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांना उद्रेक दिसेल असंही शेट्टी म्हणालेत. सरकारने प्रश्न सोडवले नाहीत तर भविष्यात आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.