सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन येतील म्हणून भाजपच्या कळपात शिरलो ही घोडचूक झाली. मात्र अच्छे दिन आले नाही तर लुच्चे दिन आले आहेत. मात्र आम्ही हाडाचे शेतकरी आहोत, जसे कमळ फुलवता येते तसे तणनाशक देखील मारायला येते. त्यामुळे या निवडणुकीत हिटलरशाही भाजपला पाडाव करण्यासाठी उठाव करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रचार शुभारंभा वेळी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार शुभारंभ येथील स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकासमोर झाला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत खा.राजू शेट्टी बोलत होते. सभेला जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, सुमनताई पाटील, उमेदवार विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार पी.एन.पाटील, सत्यजीत देशमुख, जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील, दिलीप पाटील यांच्यासह आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दादा-बापू विचारांनी एकच होते. बापुंचा मुलगा म्हणून मला कधी दादांनी वेगळी वागणूक दिली नाही. विष्णूअण्णांबरोबर देखील जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे दादा-बापू वाद नाही. आमच्या वारसात काय असेल ते आम्ही बसून बघून घेऊ पण दोघांच्या भांडणात तिसऱ्या लोकांची शक्ती वाढू नये त्यासाठी एकत्र येऊ व भाजप-सेनेचा पराभव करू, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केले.