अदानी आणि अंबानींसाठीच केंद्राने कृषी विधेयकं मंजूर केलं – राजू शेट्टींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याच दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. कृषी क्षेत्रात अदानी आणि अंबानींना व्यापार करता यावा म्हणून केंद्राने घाईघाईने कृषी विधेयकं मंजूर केली असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

सरकारने जी तीन कृषी विधेयक मंजूर केली. त्या विधेयकांची कुठल्याही शेतकऱ्याने किंवा शेतकरी संघटनेने मागणी केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये जगाची अर्थव्यवस्था कोलमडली. आपला देशही अपवाद नव्हता.पण शेती क्षेत्र या काळात स्थिर होतं. त्यावेळीच हा बिझनेस कॉर्पोरेट हाऊसेसना दिसला. अदानी-अंबानी यांना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा, लॉकडाऊनमधला त्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी पायघडया घालून ही तीन विधेयकं मंजूर केली” असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

सरकारने मोठेपणा दाखवून तिन्ही विधेयकं मागे घ्यावीत. लोकभावना लक्षात घेऊन कायदे करण्याची गरज असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या पोरांची डोकी भडकली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं सांगतानाच शेतकरी पहिल्यांदाच काहीतरी मागतोय. अन्यथा आणीबाणीच्या काळात जसा उद्रेक झाला तसा उद्रेक होईल, असा इशारा शेट्टी यांनी आज दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’