हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचा खुशाल समर्थन करावे. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांला खड्ड्यात घालणारा आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पा बाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी, महिला, बँकिंग, सहकार, कॉपोरेट क्षेत्र, डिजिटल सेवा यासह अनेक क्षेत्राबाबत सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. याचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदीसाठी २ लाख ४७ हजार कोटीची तरतूद केली होती. पण सरकारने सगळा शेतीमाल खरेदी केला नाही. मात्र पैसे सगळे खर्च झाले.
यावर्षी त्यामध्ये १० हजार कोटीची कपात केली आहे. अर्थसंकल्पात २ लाख ३७ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. म्हणजे गेल्यावर्षी पेक्षा १० हजार कोटींनी जी तरतूद कमी आहे तिथे स्वागत करण्यासारखे आहेच काय? शिवाय गेल्या वर्षी एकूण बजेटच्या ४.३६ टक्के तरतूद शेतीसाठी होती. यावर्षी ती ३.७६ इतकी करण्यात आली आहे. म्हणजे पाऊण टक्क्यांनी शेतीचे बजेट कापण्यात आले आहे, असे यावेळी राजू शेट्टी यांनी म्हंटले.