कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील अनेक कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेना आक्रमक झाली आहे. मागील आठवाड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. खुद्द सहकार मंत्र्यांनी च शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. 22 मार्चला सह्याद्री कारखान्यावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. राजू शेट्टी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का हे त्यांनी तपासून पाहावं असा टोला राजू शेट्टी यांनी बाळासाहेब पाटील यांना लगावला. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सहकार मंत्र्यांची आहे. पण त्यांच्याच नेतृत्वाखाली असणाऱ्या सह्याद्री साखर कारखान्याने एफआरपी रक्कम दिलेली नाही.
एफआरपी न देणे याचा अर्थ ते साखर कारखानदार सरकारची थकबाकीदार आहेत असं समजलं जात. महाराष्ट्रातील ज्या साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. त्या साखर कारखान्याने पूर्ण एफआरपी दिली नसेल तर ते सरकारी देणेकरी आहेत. अशा परिस्थितीत जे सध्याचे विद्यमान संचालक आहेत त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार नाही अस ते म्हणाले.
साखर आयुक्त आणि सहकार मंत्र्यांनी अन्याय केला तर त्यांना न्यायालयात खेचण्यात येईल असेही राजू शेट्टी म्हणाले. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ऊस एफआरपी मिळवून देणे ही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यात ते कमी पडले आहेत त्यामुळे येत्या 22 तारखेला पीडी पाटील यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा