हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ऊसदरावरून चांगलेच आंदोलन पेटले होते. ऊसाच्या एफआरपीच्या मुद्यांवरून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य सरकार विरोधात आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर आता साखरेला चांगला दर मिळाले असल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ” राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला 3700 रुपये भाव द्यावा”, अशी मागणीकेली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ऊसाबाबत सांगायचे झाले तर उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत मिळतो. सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे राज्य सरकारने ऊसाला टनाला 3700 रुपये भाव द्यावा. तसेच राज्यात ज्या ज्या कारखान्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. अशा सर्व कारखान्यांची चौकशी करून ते पुन्हा सुरु करावेत.
शेट्टी पुढले म्हणाले की, साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रुपये भाव वाढला आहे. इथेनॉलचे भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. द्राक्ष पिकांचंही अवकाळीने नुकसान झालं. आता छाटणी कधी करायची? असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
द्राक्ष उत्पादकांची चिंता मिटविण्यासाठी आम्ही नाशिक जिल्ह्यात द्राक्ष परिषद घेणार आहे. सरकारने फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊ. शेतकरी आंदोलनाची आम्ही प्रेरणा घेतली. आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाआधार देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मागे लावू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.