कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज या यात्रेचा सहावा दिवस आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना आपला पाठिंबा दर्शवला. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आपणही या यात्रेत सहभागी होणार का? असा सवाल केला असता त्यांनी स्पष्टपणे यावर उत्तर दिले. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते .
राजू शेट्टी म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं आम्ही स्वागतच केलं आहे. फक्त राहुल गांधीच नव्हे तर देशातील कोणत्याही नेत्याने अशा प्रकारच्या पदयात्रा काढल्या पाहिजेत. मी सुद्धा अनेक पदयात्रा काढल्या आहेत. पदयात्रेमुळे तळागाळातील लोकांशी थेट संपर्क होतो. लोकांचे जनजीवन समजत, त्यामुळे मोदींनीही जर जग फिरून झालं असेल तर देश पाहण्यासाठी ३ महिन्यांची पदयात्रा काढावी असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
ऊस आंदोलनातून मला मोकळीक मिळाली तर कदाचित मी सुद्धा भारत जोडो यात्रेत जाईन. मी जाणार नाही असं नाही, पण महाराष्ट्रातच गेलं पाहिजे असं नाही, मध्यप्रदेशात पण जाऊन मी या यात्रेत सहभागी होऊ शकतो आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकतो . राहुल गांधींची भूमिका मला पटली असून प्रत्येक राजकीय व्यक्तीने अशा पद्धतीने फिरलं पाहिजे असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.