हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. त्यातच भाजप आमदार राम सातपुते यांनी भर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करताच राष्टवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली. अखेर राम सातपुते यांनी माफी मागितल्यानांतर या प्रकरणावर पडदा पडला.
नेमकं काय घडलं ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन धर्म फेकून देशाला संविधान दिले. त्यांचे संविधान बाजूला सारून पुन्हा एकदा सनातन धर्माच्या माध्यमातून अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था परत आणायची आहे का? असा सवाल राष्टवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावेळी त्यांनी राम सातपुते यांना उद्देशून म्हंटल की, तुमचा माळशिरस हा मतदारसंघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे राखीव झाला, म्हणूनच तुम्ही इथे आलात. सनातन धर्माचे राज्य असते तर तुम्ही त्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले नसतात तर चाकरी करत असता.
आव्हाड यांच्या या विधानानंतर राम सातपुते चांगलेच संतापले. मी दलित असल्याचा मला अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मला आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, त्यामुळेच मी विधानसभेत आमदार म्हणून निवडून येऊ शकलो. मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राम सातपुते यांच्या या विधानाने राष्टवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ घातला.
आम्ही जसा वरिष्ठांचा आदर करतो तसा त्यांनी देखील आमच्या नेत्यांचा आदर केला पाहीजे. त्यामुळे सभागृहात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख योग्य नाही. सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचेही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर शब्दाने शब्द वाढततील. त्यामुळे राम सातपुते यांनी तात्काळ माफी मागून विषय संपवावा अशी मागणी अजित पवार यांनी केली. अखेर राम सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या विषयांवर पडदा पडला.