हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेंटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे अशी टीका करत राज ठाकरेंनी धर्मा- धर्मात तेढ निर्माण करू नये असं आठवले यांनी म्हंटल. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, राज्यात अशा पद्धतीने भोंग्यावर वाद होता कामा नये. मशिदीवरील भोंगे हे पिढ्यान पिढ्या आहेत. हे भोंगे काढण्यापेक्षा राज ठाकरेंनी मंदिरावर भोंगे लावावेत. पण धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे काम राज ठाकरेंनी करू नये असे रामदास आठवले यांनी म्हंटल. तसेच राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली आहे, त्यांनी कठोर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, झेंड्याचा रंगही बदलला आहे पण त्याचा त्यांना काय फायदा होईल असं वाटत नाही असंही आठवले म्हणाले
ते पुढे म्हणाले, राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या उलट सुलट भूमिका घेणं आणि चर्चेमध्ये राहणे ही राज ठाकरेंची नेहमीची सवय आहे. त्यामुळे त्यांनी आता कठोर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे जी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधातील आहे असं म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे