हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. प्रवेशावेळी खोतकरांनी इच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असे म्हणत आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असा सवाल कदम यांनी विचारला आहे.
रामदास कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटात जाण्यापूर्वी सर्वात अगोदर खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. हा एवढा घाबरट कधीपासून झाला? खोतकरांना मी वाघ समजत होतो, असे कदम यांनी म्हंटले.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतली आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का त्यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप कदम यांनी केला आहे.