मुंबई प्रतिनिधी |अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पक्ष प्रवेशाच्या वेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्याचा उचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर वर्णी लागणार आहे.
शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या ७ जूनला मतदान पार पडत आहे. त्या जागेवर भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना साधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात त्यांना मंत्री देखील बनवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित १० वर्षानंतर प्रथमच मोहिते पाटील घराण्यातील व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात असणार आहे. तूर्तासमंत्री मंडळात समावेशाच्या बाबीला कोठून हि दुजोरा मिळत नसला तरी विधान परिषदेची आमदारकी मात्र निश्चित मानण्यात येत आहे.
१४ जानेवारी रोजी आमदार शिवाजीराव देशमुख यांचे मुंबईत निधन झाले होते.. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी ६ महिन्याच्या आत निवडणूक अपेक्षीत होती. त्यानुसार आता निवडणूक जाहीर झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील या आधी राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. त्याच प्रमाणे त्यांचे वडील खासदार विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.