सांगली | सांगलीतील गावभाग मध्ये राहणार्या एका तरुणाने व्याजाने घेतलेले 1 लाख रुपये व्याजासह 2 लाख 7 हजार रुपये देऊनही अधिकचे चार लाख रुपये देण्यासाठी चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुंड छोट्या बाबरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका महिला पोलिसाचा देखील समावेश आहे. या प्रकरणी सचिन सुरेश शिवजी याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विक्रांत उर्फ छोट्या बाबर, रेखा बाबर, ओंकार बाबर, अभिजित कोकाटे, पोलीस कोमल धुमाळ, सोनम कोकाटे, अमित धुमाळ, वैशाली धुमाळ यांसह अन्य तिघे शी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुंड छोट्या बाबर याला अटक केली आहे. सदरची घटना हि 2016 ते 19 एप्रिल 2022 या कालावधीत घडली.
सचिन हे मार्च 2016 मध्ये छोट्या बाबर याच्या घरी भाड्याने रहात होते. त्यावेळी सचिन व त्यांची आई यांनी त्यांच्या घरगुती अडचणीसाठी एक लाख रुपये बाबरकडून व्याजाने घेतले होते. ते पैसे सचिन यांनी व्याजासह परत केले आहेत. तरीही बाबर याने सचिन व त्यांच्या कुटुंबियांना पैशासाठी त्रास व धमकी देत २ लाख रुपये वसूल केले. त्यानंतरही आणखी पैशाची मागणी केली होती
त्यांनतर सचिन हे दुचाकीवरून जात असताना त्याला छोट्या बाबर व त्याच्या अनोळखी मित्रांनी गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करत आणि चाकूचा धाक दाखवत चार लाख रुपयांची मागणी केली. सचिन याना यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सचिन यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दरम्यान, गुन्हा दाखल असलेल्या महिला पोलिसांबाबत चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.