औरंगाबाद – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात. यावेळेस ही दानवे हे त्यांच्या इंधन दरवाढीच्या अजब दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. पेट्रोलच्या किंमती कॉंग्रेसच्या काळात जागतिक परिस्थितीसोबत जोडलेल्या आहेत. देशातील पेट्रोल-डीझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार किंमती रोज खाली वर करत नाही, त्याचा दोष सरकारला देणे योग्य नाही, असा अजब दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
कॉंग्रेसने महागाई विरोधात काढलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना दानवे म्हणाले, इंधन किंमतीच्या वाढत्या किंमतीवर यांनी मोर्चे काढले. मात्र, कॉंग्रेसच्या काळात पेट्रोल-डीझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेची जोडल्या आहेत. केंद्र सरकार रोज किंमती वाढविण्याचे काम करत नाही.केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असे असतानाही केंद्राने आपला कर केला, पण राज्य कर कमी करण्यास तयार नाही. हे आपण लोकांना सांगायला हवे, हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैश्यांवर चालते. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीकाही दानवे यांनी यावेळी केली.
गुंठेवारीवरून शिवसेनेला इशारा
शहरातील गुंठेवारी प्रकरणात महापालिका प्रशासकांकडून धमकावण्याचे काम सुरू आहे. मात्र, पालकमंत्री आले त्यांनी स्थगिती दिली. एकीकडे लोकांना धाक दाखवायचा आणि दुसरीकडे स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असे दाखवायचे. तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा. भाजप एकही झोपडी पाडू देणार नाही. शिवसेनेने गुंठेवारी असो की झोपडपट्टी असो एकही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू असा, इशारा दानवेंनी दिला.