सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात ! पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत केला बलात्कार

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नाशिकमधील विवाहित तरुणीशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी संशयिताला अजूनही अटक केलेली नाही.

काय आहे नेमके प्रकरण ?
नाशिकच्या एका विवाहितेची 18 ते 28 डिसेंबर 2021 च्या दरम्यान शेअर चॅट अ‍ॅपच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली. यानंतर या दोघांचे मैत्रीत रूपांतर झाले. या आरोपी तरुणाने वेळोवेळी विवाहितेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांचे फोनवरूनसुद्धा बोलणे होत होते. यानंतर त्याने तिचा विश्वास संपादन करून तिला भेटायला बोलावले. त्यानंतर हे दोघे पर्यटनाच्या नावाखाली शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी आदी ठिकाणी फिरून आले. या दौऱ्यात त्यांनी अनेक फोटो काढले. यावेळी पीडित तरुणीने या सोशल मीडियावरील मित्रासोबत सेल्फीही काढली. नेमका याचाच फायदा घेत या तरुणाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

संशयित मुंबईचा रहिवासी
या आरोपीने हे फोटो आणि विशेषतः सेल्फी तुझ्या नवऱ्याला पाठवतो अशी धमकी पीडित तरुणीला दिली. यानंतर त्याने पीडित तरुणीला बोलावून तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच याची कुठे वाच्यता न करण्याची धमकीसुद्धा दिली. हा संशयित आरोपी मुंबईचा असल्याचे समजत आहे. हा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने अखेर शेवटी भद्रकाली पोलीस ठाण्यात जावून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.