हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत. भारत आणि हिंदूंना वेगळे केले जाऊ शकत नाही. त्यामुळे भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असे भागवत यांनी म्हंटले आहे.
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. यावेळी भागवत म्हणाले की, “हिंदूंशिवाय भारत नाही आणि कोणत्याही हिंदूविना भारत नाही. भारत पाकच्या फाळणीनंतर भारताचे तुकडे झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. आम्ही हिंदू आहोत ही संकल्पना विसरल्यामुळेच हे सर्व झाले. आमच्याबरोबर त्या ठिकाणी राहत असलेले मुस्लीमदेखील आपण भारतीय हिंदू आहोत हे विसरले होते. आधी स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची ताकद कमी झाली, नंतर त्यांची संख्या कमी झाली. म्हणूनच पाकिस्तान भारत राहिला नाही”
सध्या देशात हिंदूंची संख्या पाहिली तर हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे त्याचबरोबर हिंदुत्वाची भावनाही कमी होत आहे. भारत हिंदुस्थान असून हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. जर हिंदूंना हिंदू राहायचं असेल तर भारताने अखंड होण्याची गरज असल्याचे भागवत यांनी म्हंटले.