मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान; फडणवीस-अजितदादांची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या जुलै महिन्यात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना “उद्योगरत्न पुरस्कार” जाहीर करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार, आज रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या ‘उद्योगरत्न पुरस्कारा’चे रतन टाटा हे पहिले मानकरी ठरले आहेत.

“उद्योगरत्न पुरस्कार” रतन टाटा यांना देण्यात आल्यानंतर उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी रतन टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टाटा यांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह, २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच, रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा इ. उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडून साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. यामध्ये आता उद्योगक्षेत्रात योगदान करणाऱ्या व्यक्तींना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. इथून पुढे साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना महाराष्ट्र भूषण प्रधान करण्यात येणार आहे. त्यानुसार, आज शासनाकडून देण्यात येणारा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला आहे.

रतन टाटा यांची कामगिरी

कोरोना काळात रतन टाटा यांनी राज्य सरकारला मदत म्हणून 1500 कोटी रुपये दान स्वरुपात दिले होते. तसेच, टाटा समूहाकडून इतर सुविधा देखील पुरविण्यात आल्या होत्या. रतन टाटा यांचे दुसरी ओळख दानशूर व्यक्ती अशी आहे. त्यांच्या नावे अनेक कंपन्या, संस्था, एनजीओ आहेत जे समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करतात. त्यांच्या या कामगिरीमुळेच रतन टाटा यांचा जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. खास म्हणजे, यावर्षीच्या एप्रिल महिन्यात रतन टाटा यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून देण्यात येतो. अशा अनेक नावलौकिक पुरस्काराचे रतन टाटा मानकरी ठरले आहेत.