Friday, June 9, 2023

गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?; शेतकरी नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “शिंदे गटातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा बराच चर्चेत राहिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन करत असताना शिंदे गटातील नेत्यांकडून काहीही बोलवले जात आहे. मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. या शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? एकनाथ शिंदे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली.

रविकांत तुपकर यांची अकोला तुरुंगातून सुटका झाली. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तुपकरांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, गुलाबराव पाटील तुमचे घर काचेचे आहे. तुम्ही गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?, असा सवाल तुपकरानी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय. ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लाव, नालीत पाणी गेले की फोन लाव, तसेच आपले मुख्यमंत्री करत असतात. आपले मुख्यमंत्री तर थानेदारालाही फोन लावतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाची गरिमा घालविली आहे, अशी टीका तुपकरांनी केली.