गोरेगाव (मुंबई प्रतिनिधी )| भाजपच्या कार्यसमितीची बैठक आज मुंबई येथील गोरेगाव मध्ये पार पडत आहे. त्या बैठकीला उपस्थितीत असणारे रावसाहेब दानवे यांनी आपल्या विनोदी शैलीत काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या पाच पाच कार्याध्यक्ष नेमण्याच्या शैलीवर देखील रावसाहेब दानवेंनी चांगलाच निशाणा साधला आहे.
मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा शाळेच्या मुख्यध्यपकांनी मला ध्वजारोहणाला येण्यास सांगितले. येताना पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घालून या असे हि सांगितले. मी बाजारात गेलो आणि पांढरा पोशाख घेऊन आलो. घरी आल्यावर कडपे घालून बघितली तर मला पँट मोठी होत होती. म्हणून मी आईला म्हणालो , आई! जरा माझी पँट मोठी होतीय ती कापून शिवून ठेव ना. आई म्हणाली तुझं लग्न झालंय बायकोला सांग शिवायला. बायकोकडे गेलो सर्व सांगितलं तर बायको म्हणाली तुमच्या घरात मी निवीनच आहे. मला असली कामे सांगू नका. सरते शेवटी मी चुलतीकडे गेलो चुलती म्हणाली त्या दोघीनी शिवले नाही. आता मी का शिवू. शेवटी हतबल होऊन मी पँट ठेवून दिली. माझ्या परस्पर माझ्या आईने ती पॅंट कापली शिवली. बायकोने आईच्या आणि माझ्या परस्पर पँट कापली आणि आणि शिवली. चुलतीने देखील आमच्या तिघांच्या परस्पर पॅंट कापली आणि शिवली. सकाळी उठून बघतो तर काय. पॅंटीच्या बर्मुडा झाला होता. अगदी तसा बर्मुडा काँग्रेसचा झाला आहे. पाच पाच कार्याध्यक्ष असतात का राव कुठं? अशा शेलक्या शब्दात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
मी अमित शहा यांनी सांगितले आहे कि पक्षाची दारे येणाऱ्या व्यक्तींसाठी खुली ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन आपल्या विचारांचे बनवता येईल असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. भाजपने आपल्या राज्यभर पसरलेल्या कार्यकर्त्यांना मुंबईत बोलवून आगामी निवडणुकीची रणनीती समजावूं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला आहे.